उद्धट
.
संध्याकाळी ६ वाजेची डि एस के ला जाणारी बस शक्यतो भरगच्चं भरलेली असते. कॉलेज,क्लास, जॉब आटपून थकलेल्या जीवांची बस मध्ये जागा मिळवण्यासाठी ची धडपड चाललेली असते.

तसं तर गाडी घेतल्या पासून माझं PMT ने जाणं बहुदा दुरापास्तच झालंय पण त्या दिवशी बऱ्याच काळानं PMT ने प्रवास करण्याचा योग आला.
सारसबागेच्या बसस्टॉप गर्दीमध्ये वाट काढीत मी बस मध्ये चढलो, चढलो म्हणण्यापेक्षा गर्दीनेच मला चढवलं व एका जख्ख म्हाताऱ्या आजोबांजवळ उभं राहण्याची जागा मला मिळाली. आमच्या जवळच्या सीट वर ऐन १८-१९ वर्षाचा कॉलेजकुमार हेडफोन कानात टाकून छान पैकी गाणे ऐकत बसलेला होता.
तुडुंब भरलेल्या बस मध्ये वाट काढीत कंडक्टर आमच्या पर्यंत येऊन तिकीट काढून पुढे केव्हा गेला याच मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. कंडक्टर च्या या गरबडीत शेजारी उभ्या असलेल्या आजोबांचा धक्का तेथे बसलेल्या 'कानसेन' तरुणास लागला व त्याची श्रवणसमाधी भंग पावली. आपल्याहून किती तरी वर्ष मोठ्या असलेल्या आजोबांना उभे असलेले बघताच त्या तरुणाने स्वतः ची जागा त्या आजोबांना देत त्यांचा मणभर आशीर्वाद मिळवला. उभा राहिलेला तो तरुण हळूहळू सरकत लोखंडी खांबाला जाऊन टेकला. व पाठीवरची सॅक पोटावर घेऊन स्वारी पुन्हा गाणे ऐकण्यात मग्न झाली. त्या खांबाजवळच्या सीट वर 60-65 वयोगटातील एक जोडपं सपाट चेहऱ्याने बसलं होतं. बस जसे जसे हिंदोळे घेत होती तसं तसा या तरुणाचा अलगद धक्का त्या काकूबाईंना बसत होता. त्यांच्या सपाट चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटायला लागले व या काकूबाईंनी त्या तरुणास हळूहळू बोटं टोचण्यास सुरुवात केली. काकूंच्या या अनपेक्षित "बोट हल्ला" मुळे भांबावलेला तरुण थोडा सावरला व कानातील हेडफोन खांद्यावर टाकून सावरून उभा राहिला. मात्र तेव्हढ्यात स्पीडब्रेकर मुळे गाडी उधळली व त्याचा धक्का पुन्हा काकूंना लागलाच.
बोटहल्ला करून सुद्धा धक्का लागल्याने काकूंचा एकप्रकारे इगो हर्ट झाला व त्यांनी आपल्या वाग्बाणांचा मारा त्या तरुणावर सुरु केला..
"लाज नाही वाटत का? लेडीज ला धक्के मारतांना, घरात आई ला अन बहिणीला असंच धक्के देतोस का?"
...क्षणभर बस मध्ये शांतता पसरली. काकूबाईंच्या तिरसट चाललेल्या फायरिंग मुळे तो तरुण गोंधळाला,
"काकू अहो गर्दी किती आहे,थोडा फार धक्का तर लागणारच ना..!"
"धक्का लागता कामा नये..."
"अहो काकू पण पब्लिक ट्रान्स्पोर्ट आहे, एव्हढा काय इश्यू करताय?"
"काय मी इश्यू करतेय?मी..मी.."
"हो मग काय!"
त्या तरुणाच्या आणि काकूबाईंच्या मध्ये काकांनी एन्ट्री केली...
"च्युप... च्युप... , साले असले कसले नीच लोकं असतात कार्ट जन्माला घालून सोडून देतात. संस्कार नाही मोठ्यांशी कसं बोलावं ह्याच वळण नाही." काकूबाई मध्येच बोलल्या "ह्याला तर आई बापच नाहीयेत"
खरं तर काका काकू चे उद्गार ऐकून माझ्या सह अनेक लोकांना क्षण भर संताप आला. पण तो 'पीडित' तरुण मात्र शांत होता. काका काकू त्याला शिव्यांची लाखोली वाहत होते. तरुणानं शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग त्याने प्रतिहल्ला सुरु केला.
"काका अहो माझ्या पेक्षा तीन पट वयाचे आहात तुम्ही... शोभतयं तुम्हाला असं बोलणं? तुमचं वय काय... तुम्ही बोलताय काय?... आणि एवढी काकूंची काळजी होती तर त्यांना आतून खिडकी जवळ बसवायचं आणि तुम्ही बाहेरून बसायचं एवढी साधी गोष्ट सुद्धा आम्ही लहनांनी सांगावी काय? आणि माझ्या संस्कारांची चिंता तुम्ही करू नका! मला उलट तुमच्या मुलांची व नातवांची चिंता वाटतेय की तुमच्या सारख्या  जोडप्याने काय संस्कार दिले असतील त्यांना!"
आता मात्र काका काकूंचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
येणाऱ्या स्टॉप ला तो तरुण उतरला,
"हल्ली ची मुलं फार उद्धट झालीये बाई... काही हाड होतं का त्याच्या जिभेला.." काकू उद्गारल्या
काका सुद्धा त्वेषात "असल्यांना तर रस्त्यांवर झोपवून रणगाडे फिरवले पाहिजे त्यांच्या अंगावरून.."
इतर प्रवासी मात्र काका काकूंकडे तुच्छ नजरे ने पाहत होते. तरुणाच्या सीट वर बसलेल्या आजोबांनी मात्र दीर्घ श्वास घेत शेजारच्या प्रवास्यास बोलले "बरं केलं पोरानं, लयं माजुर्डी जोडं हाय त्यी"
मी मात्र माझा स्टॉप येई पर्यंत घडलेल्या प्रसंगा बद्दल विचार करत होतो!
खरंच आज ची मुलं उद्धट झालीयेत की मोठ्यांच्या तिरसटपणास उत्तर द्यायला शिकली आहेत?
प्रश्न अजून अनुत्तरीत आहे.
(सत्यघटनेवर आधारित)


Comments

  1. Reality...quarrel between young generation nd senior citizens at the time of travelling...but truth is what?

    ReplyDelete
  2. Reality...quarrel between young generation nd senior citizens at the time of travelling...but truth is what?

    ReplyDelete
  3. Both sides were truth... it's nothing but a generation gap..
    Or habbit of assumption

    ReplyDelete
  4. Both sides were truth... it's nothing but a generation gap..
    Or habbit of assumption

    ReplyDelete
  5. Both sides were truth... it's nothing but a generation gap..
    Or habbit of assumption

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शिवाग्रज , शिवबंधु : संभाजीराजे.

मोहनजोदारो