स्टोरीज फ्रॉम बिहार
।। दुसरी कथा।।
मुनिया
लेखक - अक्षय प्रकाश नेवे,
==================================
रविवारचा दिवस हा एसपी साहेबांचा खास कुटुंबासाठी राखीव असलेला दिवस होता. कर्तव्याएवढंच कुटुंब देखील महत्वाचं आहे असं त्यांचं वैक्तिक मत होते! त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगून ठेवले होते की काही अत्यावश्यक काम असेल तरच त्यांना फोन करावा नाहीतर ते काम आपण सोमवारी बघू!
..
तो रविवारचा दिवस होता एसपी साहेब आपल्या पूर्ण कुटुंबासोबत कोणतासा चित्रपट पाहण्याकरिता म्हणून नजीकच्या चित्रपटगृहात गेले होते, मध्यंतरा दरम्यान मोबाईल चेक करत असताना डिएसपी चे चार कॉल आल्याचं त्यांनी बघितलं आणि लगेचच रिटर्न कॉल केला. व त्यांनी मिसेस ला सांगितले की काही आवश्यक काम निघालाय मी निघतोय तू चित्रपट संपला की आई बाबा आणि मुलांना घेऊन घरी जा, मी ड्रायव्हर ला पाठवून देतो!
...
सायरनचा आवाज करीत पोलिसांची गाडी दानापूरच्या त्या वस्तीमध्ये शिरली व चंपालाल रजक च घर कोणतं आहे ही चौकशी करीत त्याच्या घरी जाऊन धडकली आणि त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन च्या दिशेने निघाली. ज्यावेळेस ती गाडी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली तो पर्यंत एसपी साहेबाना सोडून त्यांचा ड्रायव्हर पुन्हा चित्रपटगृहाकडे जाण्याकरिता निघाला होता. व इन्स्पेक्टर साहेबांना खात्री पटली की एसपी साहेब आलेत म्हणजे या प्रकरणाचा छडा लवकरच लागेल
...
SHO च्या चेंबर मध्ये एसपी साहेब, डिएसपी मॅडम, इन्स्पेक्टर असे तिघे गहन चर्चेत गुंतले होते आणि तेव्हाच एसपी साहेबांनी त्या मुलीला बोलावण्याचा आदेश दिला.
(फोटो - गुगलहुन साभार)
...
एसपी साहेबांच्या आदेशानंतर दोन महिला शिपाई त्या मुलीला घेऊन आले. दहा वर्षांची लहान मुलगी होती ती!
" बाबू, काय नाव तुझं?" एसपी साहेबांनी विचारलं
"मुनिया" ती उत्तरली,
थोडी जुजबी चौकशी झाल्यावर एसपी साहेबांनी मुद्याला हात घातला!
" सांग बाबू , काय काय झालं ते बिनधास्त सांग!"
हातातल्या कॅडबरीचा शेवटचा तुकडा संपवत मुनिया बोलू लागली.
" माझे बापूंनी माझ्या इज्जत वर हात टाकला!"
एसपी साहेब या पहिल्या वाक्याने उडालेच! पण तरी त्यांनी तिला मध्ये न टोकता पूर्ण गोष्ट एकूण घ्यायची ठरवले!
"... माझा बापू माझ्या माँ ला पण असंच करायचा, खूप मारायचा, माझी माँ चांगली होती पण बापूला ती आवडत नव्हती, अचानक एकेदिवशी मी रात्री आरडाओरडा ऐकून उठले तर माझा बापू माझ्या माँ शी भांडत होता त्यांची मारामारी पण चालू होती, आणि माझी दीदी कोपऱ्यात अंग चोरून हमसून हमसून रडत होती. त्याच रात्री माझी दीदी घरातून पळून गेली व दानापूर जवळ रेल्वे लाईन वर तिने रेल्वे खाली आत्महत्या केली. आणि काही दिवसांनंतर माझी माँ पण मला पुन्हा दिसली नाही! आणि आज तर माझ्या बापूने मला पण.."
...
डिएसपी मॅडम संतापाने लालबुंद झाल्या होत्या! त्या आवेगाने उठल्या व बोलू लागल्या " सर ही डोमेस्टिक व्हायलान्स ची केस आहे. वी निड टू टेक इट सिरियसली!, रेप, सेक्सउअल हाराष्मेंट आणि डबल मर्डर , ए घ्या रे त्याला रिमांड मध्ये "
...
एक महिला आणि विशेषतः दोन मुलींची आई म्हणून डिएसपी मॅडम चा क्रोध एसपी साहेब समजू शकत होते त्यामुळे त्यांनी डिएसपी मॅडमला आवरले नाही. मात्र तरी चंपालाल कडे पाहून त्यांना विश्वास बसत नव्हता की हा माणूस असं काही करेल म्हणून!
...
चंपालालला पोलीस उचलून घेऊन गेलेत ही गोष्ट हळूहळू पूर्ण वस्ती भर पसरली, गुडीया धावत पळत आपल्या नवऱ्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेली व तिच्या सोबत अनेक लोक हे चंपालाल ला ओळखत होते ते पण पोलीस स्टेशन ला जाऊन पोहोचले!
...
एव्हाना डिएसपी मॅडम व इतर महिला पोलिसांनी चंपालाल ला बदड बदड बदडून काढला होता! टायरामधे घुसवून दांडक्यांनी त्याला चांगला कुटला होता!
अखेर एसपी साहेबांना त्याची दया आली आणि त्यांनी इन्स्पेक्टर साहेंबाना हे सगळं थांबवण्याचा आदेश दिला. तो पर्यंत बाहेर तीस पस्तीस बायका पुरुष जमली होती! बाहेर काय गडबड गोंधळ चाललंय हे बघण्यासाठी एसपी साहेबांनी इन्स्पेक्टर साहेबाना पिटाळले! इन्स्पेक्टर जाताच सगळा गोंधळ शांत झाला काही वेळातच इन्स्पेक्टर पुन्हा चेंबर मध्ये आले आणि म्हणाले सर काही लोक तुम्हाला भेटू इच्छित आहेत , चंपालालच्या विषयी, एसपी साहेबांनी होकार दिला!
व काही मिनिटात गुडीया तिचा नवरा व आणखी एक दोघे एसपी साहेबांसमोर हजर झाले!
त्याच वेळेस डिएसपी मॅडम सुद्धा चेंबर मध्ये आल्या,
"कोण हवंय?" डिएसपी मॅडम ने गुडीयाला विचारलं
"एसपी साहेबाना भेटायचं आहे"
"काय काम आहे?"
"चंपालाल रजक साठी..."
"लाज नाही वाटत एवढ्या हरामखोर माणसासाठी पैरवी करतांना!"
"अहो मॅडम एका तर..."
गुडीया काही बोलणार तो पर्यंत बेल वाजली आणि चेंबर मधून एसपी साहेबांचं बोलावणं आलं!
थोड्या वेळ अगोदरच एसपी साहेबांनी जमादाराला बोलवून मुनियाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी क्रॉस चेक करण्याचा आदेश दिला होता, ते जमादार देखील तो पर्यंत येऊन पोहोचले, इन्स्पेक्टर साहेबांनी आलेल्या लोकांना पुन्हा बाहेर बसवले आणि जमदाराशी चर्चा सुरु झाली!
'सर मुनिया सांगते त्यातल्या काही गोष्टी खऱ्या आहेत, आपल्या खबऱ्याने सांगितले की घरात चंपालाल आणि मुनिया असे दोघेच राहतात, आणि चंपालाल ची बायको व मोठ्या मुली विषयी त्याला काही कल्पना नाही. आणि दानापूर ला मुनिया वर्णन करते आहे त्या पद्धतीने कुणी आत्महत्या केल्याचा उल्लेख कोणत्याही रेकॉर्ड मध्ये नाही!'
आता मात्र डिएसपी मॅडम अवाक झाल्या होत्या!
"सर मी काय म्हणते, कशाहून की चंपालाल ने पुरावा नष्ट केला नसावा? हल्ली साधेपणाच्या बुरख्याआड कोण सराईत गुन्हेगार असेल सांगता येत नाही"
एसपी साहेबांनी फक्त हुंकार भरला! आणि जमादाराला विचारले "मुनियाचे मेडिकल रिपोर्ट आलेत का?"
"सर मिळतीलच एवढ्यात, डॉक्टर म्हणताय की अधिकृत रिपोर्ट परवा मिळेल पण आमचे जे फाइंडिंग्ज आहेत ते आम्ही लगेच कळवू"
"ठीक आहे! डोकं गरगरायला लागलं आहे सगळं ऐकून!"
"सर, लेट्स हॅव अ कप ऑफ टी!"
"ओह ऑफकोर्स! आय विल प्रेफर्ड ग्रीन टी!"
"आय नो सर! हॅव यु टेस्टेड हनी लेमन फ्लेवर?"
"ओह आय लाईक इट!... विथ टू क्यूबस् ऑफ शुगर"
"यस सर!"
डिएसपी मॅडम ने स्वतः ग्रीन टी सर्व केला!
"इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला काय वाटतं ह्या केस बद्दल?"
"सर, मुनिया ने सांगितलेले फॅक्टस मॅच करत नाहीयेत! कदाचित आपण जे बघतोय त्यापेक्षा सत्य काही तरी वेगळं असू शकतं!" इन्स्पेक्टर साहेबांचा अनुभव त्यांच्या देहबोली वरून स्पष्टपणे झळकत होता!
" सर ती लोक बाहेर थांबली आहेत त्यांना बोलवावं का?"
"हम्म, कॉल देम!" चहाचा कप ठेवीत साहेब बोलले!
...
"हम्म गोंधळ ना घालता शांतपणे बोला काय बोलायचं आहे ते!" जमादाराने त्या आलेल्या लोकांना दम भरला!
" साहेब ते चंपालाल रजक.."
"हा त्याच काय?"
" त्यांनी काही केलं नाहीये, ते निर्दोष आहेत!"
" स्वतःच्या पोटच्या पोरींवर वाईट नजर टाकणारा, बायकोचा आणि पोरीचा दोन दोन खून करून राजरोस पणे मिरवणारा खुनी निर्दोष? त्याला तर फासावर लटकावला पाहिजे!"
" साहेब काही तरी दिशाभूल होते आहे तुमची!" गुडीया मध्येच बोलली!
"तुम्ही कोण?"
"मी गुडीया , गुडीया लखन पासवान आणि हे माझे मिस्टर आहे!"
" हा मग? त्या चंपालाल शी काय संबंध?"
"त्या चंपालाल रजक यांची मी मोठी मुलगी!"
"व्हॉटट्ट?????" डिएसपी मॅडम चक्रावल्या!
"पण मुनिया सांगत होती की चंपालाल ने तुझ्यावर जबरदस्ती केली आणि त्याच दिवशी तू आत्महत्या केली म्हणून!"
"काय? तस काहीही झालं नाहीये! मी जिवंत तुमच्या समोर उभी आहे हे माझे पती सुद्धा माझ्या सोबत आहे, त्यांना विचारा हवं तर!"
"ओह गॉड .." डिएसपी मॅडम उद्गारल्या!
" अजून काय काय सांगितलंय मुनियाने?"
इन्स्पेक्टर साहेबांनी संपूर्ण गोष्ट गुडीयाला सांगितली!
" साब, घरात बापू आणि मुनिया हे दोघेच राहतात हे खरे आहे! माझं लग्न झालं आणि त्यानंतर मी सासरी गेले , सासरी म्हणजे फक्त दोन गल्ल्या सोडून पलीकडे! आणि बापू दानापूर स्टेशन वर कुली आहेत म्हणून घरात फक्त मुनिया एकटी असते मी सुद्धा आशा कार्यकर्ता म्हणून काम करते, त्या मुळे माझ्या घरी तिला ठेवता येत नाही! आणि घरी एकटी असल्याने तिच्या डोक्यात काय काय चालतं हे मला लक्षात आलं नाही!"
"आणि मग तिची आई? तीच पण लक्ष नाही का मुली कडे!"
" आई आमच्या सोबत नसते, पण आम्ही तिला काही कमी पडू देत नाही! तिला घरात एकटीला करमावे म्हणून टीव्ही घेऊन दिला तिच्या जिजाजीनी"
"तिची आई कुठे असते?" एसपी साहेबांनी गुडीयाला प्रश्न केला?"
"ती नसते आमच्या जवळ!"
नक्की कुठे तरी पाणी मुरतंय याचा संशय एसपी साहेबांना आला!
एसपी साहेबांनी सगळ्या इतर लोकांना बाहेर जाण्याचा आदेश दिला आता चेंबर मध्ये फक्त गुडीया, तिचा नवरा, इन्स्पेक्टर, डिएसपी आणि एसपी एवढेच लोक होते.
"हम्म आता एक एक गोष्ट स्पष्टपणे सांग! जे आता पर्यंत सांगितली नव्हती" एसपी साहेब बोलले!
"साब, माझी माँ माझ्या बापूला जास्त पसंद करत नव्हती, बापू दिसायला जरी काळासावळा असला तरी मनाने खूप चांगला माणूस आहे! सरकारी कुली आहे म्हणून माझ्या नानाजी ने माझ्या माँ च लग्न बापूशी लावून दिलं, पण त्यांच्यात सतत वाद होत असे , त्यात बापू कामाला गेला की माँ वस्तीतल्या अनेक मुलांशी ..."
गुडीयाला संताप अनावर होत होता! "एकदा तर माँ च्या एका प्रियकराची नजर माझ्यावर पडली, बापू कामावर गेल्यावर नेहमी प्रमाणे तो आला व माँ शी बोलता बोलता अचानक त्याने माझ्यावर झडप घातली , मी तेथून निसटले आणि घराबाहेर पडताच ह्यांना जाऊन धडकले!"
लखन ने गुडीयाच्या म्हणण्याला दुजोरा दिला!
"त्या दिवशी जे झालं त्यात मी तर लखन मुळे वाचले आणि जे काही झालं ह्याची वाश्चता आम्ही कुठेही केली नाही व बापूच्या संमतीने लग्न करून घेतलं! ह्या सगळ्यात मात्र त्या बाईला जरा देखील पश्चाताप वाटला नाही! उलट माझं लग्न होऊन ती अधिकच बेफाम झाली! लहान मुली समोर ती काय करते आहे ह्याचं भान सुद्धा तिला राहत नसे! ज्या वेळेस बापूला माहित पडले त्या वेळेस तिला बापूने खूप मारले व त्याच रात्री ती तिच्या त्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली!"
गुडीया हमसून हमसून रडू लागली! लखन ने तिला मिठीत घेत शांत करण्याचा प्रयत्न केला!
" साब, ह्या विषयी आम्ही कधीही काहीही बोलत नाही, मी माझ्या आई वडील भाऊ आणि वहिनींना पण ह्या बद्दल जतवून ठेवलंय! पण आज मात्र..." लखन उद्विग्न होऊन बोलला!
एसपी साहेबांनी चंपालाल ला बोलावण्याचा आदेश दिला! सुजलेला लाल, काळा, निळा पडलेला चंपालाल समोर पाहताच कासावीस झालेली गुडीया हमसून हमसून रडू लागली!
एसपी साहेब म्हणाले " चंपालालजी पोलिसांच्या गैरसमजामुळे आपणास जो काही त्रास झाला आहे त्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो! व तुमच्या इलाजासाठी जो खर्च येईल तो डिपार्टमेंट करेल!"
डिएसपी मॅडम चांगल्याच खजील झाल्या होत्या पण त्यांनी देखील ग्वाही दिली की मुनियाचा शिक्षणांचाच नव्हे तर तिच्या लग्नाचा देखील संपूर्ण खर्च मी उचलेल आणि चंपालाल यांनी परवानगी दिली तर मुनिया चे रीतसर दत्तक पालकत्व घ्यायला देखील त्या तयार झाल्या!
"पण सर , मग ती मुनियाने सांगितलेली स्टोरी? " इन्स्पेक्टर साहेबांनी विचारले!
" त्यातल्या घटना काही खऱ्या तर काही कल्पित आहे, काही ठिकाणी मुनिया च स्वतः च इंटर प्रिटीशन आहे!
आणि एकंदरीत जी परिस्थिती निर्माण झाली त्यातून मुनियाच्या अबोध मनाने जो बोध घेतला त्यातून ती स्टोरी निर्माण झाली!"
"सर तुम्हाला बरं या गोष्टीच आकलन झालं!"
"यूपीएससी मेन्स ला सायकॉलॉजी ओपशनल होता माझा!असो, मुनिया ला सायकोलॉजिस्ट कडे रेफर करा आणि आमची घरी जायची व्यवस्था करा!"
" यस श्योर सर!"
©अक्षय प्रकाश नेवे.
.
(शेअर करण्यास परवानगीची आवश्यकता नाही.)
.
Comments
Post a Comment