प्रवास

 #स्टोरीज फ्रॉम बिहार

।।तिसरी कथा।।


प्रवास

लेखक - अक्षय प्रकाश नेवे

....

डिसेंबरचा अखेरचा आठवडा असेल, कौशिक आणि त्याचे कुटुंब झारखंड मधील देवघरच्या बाबाधाम म्हणजेच वैज्यनाथ महादेवाच्या दर्शनासाठी निघाले होते! महाराष्ट्रातून मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड होत बंगालच्या आसनसोलला जाणारी ती रेल्वे होती! धुक्यामुळे ट्रेनच्या वेळापत्रकाचे बारा वाजले होते, अखेर सायंकाळी केव्हातरी ती ट्रेन जबलपूर स्टेशन मध्ये शिरली व धावतपळत जाऊन कौशिक व त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या रिजर्व सीट वर पोहोचत सुटकेचा निश्वास सोडला! एस ९ बोगीत त्यांची सहा सीट्स रिजर्व होती! "साधारणपणे १५ - १६ तासात ट्रेन जसीडीह स्टेशन ला पोहोचणे अपेक्षित आहे, तेथून बाबाधाम फक्त ३० मिनिटे , तो पर्यंत आराम करा!" कौशिकचे बाबा बोलले, आणि थोडे गप्पा टप्पा करीत ते पूर्ण कुटुंब निद्रादेवीच्या अधीन झाले. 

पहाटे केव्हा तरी लोकांच्या आवाजाने कौशिकचे झोपमोड झाली, ट्रेन बक्सर स्टेशन वर लागली होती. आरक्षित बोगी स्थानिक प्रवाश्यांनी भरून गेली, काही तरुण उद्धटपणे अगोदर बसलेल्या किंवा झोपलेल्या प्रवाश्यांवर रुबाब झाडीत त्यांची सीट बळकावून बसले!

"हाऊ अनसिव्हिलाइझ यु आर! ही माझी रिझर्व्ह सीट आहे.. " पली कडील सीट वरचा एक प्रवासी वैतागून बोलला, त्याला उत्तर देत तो स्थानिक तरुणांचा टोळक्यातील मुलगा उत्तरला " बरं मग? मी काय करू? सीट फक्त रात्री झोपण्यापूरती असते , सकाळी सहा नंतर कोणीही बसू शकतं!, ज्यादा काबिल मत बनो, नही तो साला इतनी मार मारेंगे की खुद की शकल भूल जाओगे" अर्थात त्या प्रवाश्याला अंग चोरून बसत त्या आडदांड माणसासाठी जागा करून द्यावी लागली! बसता बरोबर त्या तरुणाने तंबाखू मळायला सुरु केली व त्याच्या सोबत असलेल्या तिघा चौघांना पण वाटली! डाव्या हातावर तंबाखु घेऊन तिच्यावर थाप मारताच तंबाखूचा गंध पसरला व कौशिक ला व त्याच्या आईला शिंका व खोकल्याची तीव्र उबळ आली! पण कुठं यांच्या नादी लागायचं? हा विचार करून कोणी काही बोलले नाही! ते स्थानिक तरुणांचं टोळकं मोठं मोठ्या आवाजात गप्पा , आरडाओरडा, जोरजोरात चेष्टा मस्करी करू लागले!

वैतागलेले कौशिक चे बाबा त्या स्थानिक तरुणांवर भडकले सुद्धा पण कौशिकच्या आईने व बहीण काव्याने त्यांना आवरले! त्यातच एक शांतसा दिसणारा स्थानिक तरुण जो बक्सरहुन चढला होता आणि कौशिकच्या वडिलांच्या बाजूला बसला होता तो बोलला, " काका जाऊ द्या दुर्लक्ष करा, हे तर नेहमीचंच आहे! "

"अहो पण ही काय पद्धत झाली का? एक तर रिजर्वेशन असून ही आम्ही ह्यांना ऍडजस्ट करतोय आठ जणांच्या जागेत पंधरा लोक बसलोय आपण आणि वर हे असला थिल्लरपणा?" कौशिकचे बाबा भयंकर तापले होते!

अचानक ट्रेन थांबली, कोणते स्टेशन आले म्हणावं तर दूर दूर पर्यंत एक ही प्लॅटफॉर्म दिसत नव्हता, कौशिकने इमर्जन्सी विंडो मधून डोकं बाहेर काढून पाहिले तर अनेक लोक ट्रेन मधून उतरतांना दिसले! 

"अरे हे काय?"

"चेन खेचली असेल कोणी! इथे असंच असत, आपली वस्ती म्हणजे टोला जवळ आला की लोक निर्धास्तपणे चेन ओढतात आणि खाली उतरून जातात!" तो शांत स्थानिक तरुण उद्गारला,

"मग त्यांच्यावर कारवाई नाही होत?" काव्याने प्रश्न उपस्थित केला.

"नाही मॅम, इथल्या लोकांना दुसरा पर्याय नाही हे ट्रेन चालकांना व इतर कर्मचाऱ्यांना चांगलंच माहित आहे! आमच्या येथे इतर ठिकाणी असतात तशी कनेक्टिव्हिटी नाहीये, त्या मुळे असे प्रकार सर्रास होतात" दोन मिनिटात ट्रेन पुन्हा सुरु झाली! 

"तुम्ही काय करता?" कौशिकचे त्या तरुणाला विचारले.

"मी नियोजित शिक्षक आहे, बक्सर हुन चाळीस किमी वर शाळा आहे माझी! रोजच अप डाउन असते! त्यामुळे हे सर्व प्रकार कॉमन आहेत माझ्या साठी!

चला , एक मिनिट साईड द्याल का? माझी शाळा आलीय जवळ , त्यामुळे रेल्वेची चेन ओढावी लागेल"

उसने हास्य  आणीत तो तरुण उद्गारला ,

कौशिकचे आजी आजोबा डोक्याला हात लावून आलिया भोगासी असावे सादर म्हणत सर्व प्रकार बघत बसले होते!

...

जरा वेळाने गाडी कुठल्याश्या हॉल्ट वर थांबली तसा खूप मोठा लोंढा रेल्वेच्या बोगीत घाई घाईत दाखल झाला, कौशिक ने नुकतीच बिहार मधील लोकप्रिय निंबू चाय चा एक कप फेरीवल्याकडून घेतला होता! ह्या वेळेस आलेली सगळी मंडळी ही बहुदा एकमेकांना ओळखत असावी, त्यातील दोघा तिघांचा संवाद कौशिक च्या कानी पडत होता,

" ... अरे हा बाबू, तसा तर माणूस ठीक ठाक होता, पण..."

" अरे भैय्ये, माणूस चांगलाच असतो फक्त त्याच्या सवयी तेवढ्या वाईट असतात!"

" अरे जाऊद्या ना , गेलेल्या माणसाबद्दल असे बोलू नये"

"अय... चलो चलो आगे बढो! " कुणी तरी दरवाज्यातून आवाज दिला आणि कौशिक च्या सीट जवळ उभी असलेली ती दोघे तिघे दाटीवाटीने थोडे पुढे सरकली,

"आराम से, आराम से.. देखो किसीं की लाथ ना लग जाये ..."

"अरे अय बबूआ थोडा पैर हटाव तो!" कौशिकच्या सीट समोर उभे राहून एका मध्यमवयीन माणसाने आदेश दिला! व कौशिक ने आज्ञाधारक बालकासारखे त्वरीत आपले पाय सीट वर घेतले!

" अरे आप सब भी पैर उठा लिजीए!"

असे म्हणत त्या व्यक्तीने खालच्या सीट वर बसलेल्या सगळ्यांना सीट वर मंडी घालून बसण्यास भाग पाडले व कौशिकच्या कंपारमेन्ट मध्ये दोन्ही बाजूच्या सीट च्या मधल्या रिकाम्या जागेत चक्क तिरडीवर बांधलेले एक प्रेत ठेऊन ती मंडळी मधल्या येण्या जाण्याच्या पॅसेज मध्ये जाऊन उभी राहिली! 

जनरलचे तिकीट घेऊन स्लीपर मध्ये चढलेले प्रवासी, अध्ये मध्ये कुठेही थांबणारी ट्रेन , सीटस् च्या मध्ये ते अनोळखी माणसाचे प्रेत आणि त्याभोवती बसलेले कौशिक चे कुटुंब! 

अजाणतेपणी, अनिच्छेने एका अनपेक्षित अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या कौशिकच्या घशातून निंबू चायचा घोट उतरायचे नाव घेत नव्हता!

Comments

Popular posts from this blog

शिवाग्रज , शिवबंधु : संभाजीराजे.

मोहनजोदारो