स्टोरीज फ्रॉम बिहार

।।पहिली कथा।।

मंटू

 लेखक - अक्षय प्रकाश नेवे.
================================
           त्या दिवशी मोठे साहेब भल्या पहाटे आपल्या पूर्ण लावाजम्या सह संपूर्ण जिल्ह्याभरात छापामारी करायला निघाले. गेल्या अनेक दिवसांपासून बालमजुरी चे वाढलेले प्रमाण त्यांना बेचैन करत होते. केंद्राकडून आलेले रिपोर्ट्स आणि स्थानिक वृत्तपत्रांनी बालमजुरीच्या उघडलेली मोहीम यांमुळे पूर्ण प्रशासन खडबडून जागे झाले होते! जवळजवळ पाच ते सहा तालुक्यांमध्ये छापेमारी करून साहेबांनी जवळ जवळ तेरा ते चौदा मुलांना वेगवेगळ्या ठिकाणून सोडवून आणले, ह्या मुलांना राबवून घेणारे देखील त्यांच्या सोबतच होते! सर्वप्रथम तर साहेबांनी त्या मुलांना पलीकडच्या खोलीमध्ये नेऊन आपल्या स्टाफ ला त्यांच्या देखरेखीचे आदेश दिले आणि पोटभर जेवण व त्यांना आवश्यक वस्तू मागवून घेतल्या! नंतर साहेबांनी मोर्चा त्या माणसांकडे वळवला ज्यांच्या तावडीतून ह्या मुलांना सोडवून आणले होते. सगळ्यांवर कायदेशीर कारवाई व योग्य ती शिक्षेची तरतूद होईल अश्या केसेस त्यांच्यावर दाखल करण्यात आल्या.
...
थोडा आवेग शांत झाल्यावर साहेबांनी प्रत्येक दुकानदाराला त्याच्या इथे काम करणाऱ्या मुलासह बोलावले व प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. व साहेब घरी परतण्यासाठी निघाले.
रात्री बिछान्यावर पहुडल्यावर  बराच वेळ त्यांना झोप आली नाही. व सदैव मंटू चा चेहरा त्यांच्या समोर फिरत होता. दिवसभर चाललेल्या छापेमारी च्या दरम्यान त्याला साहेबांनी मुक्त केला होता, व ज्यावेळेस त्याच्या मालकासह साहेब त्यांना भेटले त्यावेळेस त्याची भेदक नजर साहेबांच्या नजरेचा ठाव घेत आरपार निघून गेली. साहेबांनी त्याला विचारले की 'आता इथून गेल्यावर काय करशील अभ्यास करशील ना? शाळेत जाशील ना? '
वास्तविक हा प्रश्न साहेबांनी सर्वच मुलांना विचारला होता व त्या मुलांनीही तोंडदाखल होकार दिला पण मंटू...
...
'आता इथून गेल्यावर काय करशील अभ्यास करशील ना? शाळेत जाशील ना? ' साहेबांनी विचारलं!
'नाही'
'...'
'...'
'का?'
'साहेब मी शाळेत जाऊन टाईमपास करायला लागलो तर माझ्या घराचं काय होईल?'
'अरे बारा वर्षाचा पोरगा तू अन काय एवढा काय घराचा विचार करतो?'
त्यावर त्याचा मालक उत्तरला "साहेब त्याचा बाप माझ्या दुकानात काम करायचा चांगला मेहनती माणूस होता, पण अचानक एके दिवशी बंगलोर ला काम मिळालंय म्हणून इथून निघाला मी त्याला त्याच्या पगारासोबतच माझ्या कडून दोन हजार रुपये जास्त दिले, की अडीअडचणीला राहू दे म्हणून! पण तो जेव्हा बंगलोर ला गेला त्यानंतर आम्ही त्याला आजपर्यंत पाहिला नाहीये!"
"पोराच्या आईला माहित असेल कुठे गेलाय ते!" साहेब उत्तरले,
"नाही साहेब तीला पण काही कल्पना नाही, गावाकडची पोर ती , लग्न झालं तेव्हा बारा वर्षाची होती आणि पोरगा झाला तेव्हा पंधरा वर्षाची तीन पोरं पदरात टाकून हीचा नवरा गायब झाला तो झालाच ! आज हा पोरगा बारा वर्षाचा आहे अन त्याची आई ह्या तीन पोरांचं पोट भरायला असमर्थ आहे, म्हणून तर मी ह्याला कामाला ठेऊन घेतला! त्यात त्याचा आईला टीबी झाला आहे, घरी झोपून असते. हा कमावतो म्हणून त्यांचं घर चालतं, पोट भरतं!
"शाळेत गेलो तर त्या खिचडीने माझं एक वेळ पोट भरेल पण आमचं पूर्ण घर उपाशी राहील, आता पुन्हा दुसरी नोकरी शोधणार!" मंटू ची जीभ तलवारी सारखी साहेबांचं काळीज चिरत गेली!
(चित्र - गुगलहुन साभार)
...
साहेब बेचैनी मुळे झोपू शकले नाहीत, अखेर उठून बाल्कनी मध्ये आले. रात्रीचे अडीच वाजले होते, बाहेर गार मंद वारा वाहत होता त्यात हलकासा रातराणी सुगंध मनास धुंद करत होता पण साहेब स्वतः ला हतबल झालेले जाणवत होते. त्या मनस्थितीत त्यांनी सिगारेट शिलगावली व त्या धुम्रवलयात गुरफटून ते विचारमग्न झालेले. निकोटिन च्या खुराकानंतर साहेबांचा मेंदू अधिक कार्यक्षमतेने धावतो.
...
.
साहेब मंटू ला म्हणाले ,"एक काम कर, उद्या तुझा आईला घेऊन बंगल्यावर ये!"
"नाही साहेब तिने काहीच केलं नाहीये, काय शिक्षा करायची ती मला करा, मी जेल मध्ये पण जाईन पण ..."
"अरे शांत, शांत एकदम, कोणी तुला जेल मध्ये टाकत नाहीये की तुझ्या आईला शिक्षा करत नाहीये."
"मग.."
"उद्या आईला घेऊन बंगल्यावर ये आणि मेमसाब ला भेट! हे घे शंभर रुपये तुझा आजचा पगार, जा पळ!"
"साहेब नको तुमचे पैसे, मी तुमचे काही काम केलेच नाही तर फुकट चे पैसे का घेऊ?"
"फुकटचे ? अरे तुला मदत म्हणून देतोय"
"नको साहेब माझी आई म्हणते की कुणीच फुकट च घ्यायचं नाही आणि हक्काचं सोडायचं नाही"
एवढ्याश्या मुलाचे विचार ऐकून साहेब स्तब्ध झाले. त्याच्या बाणेदारपणा पुढे ती शंभराची नोट साहेबांना फिकी वाटायला लागली!
"ठीक आहे उद्या ये बंगल्यावर!"
...
रात्रीचे तीन वाजले होते, साहेब अजूनही बाल्कनीत होते, अलगत मेमसाबनी साहेबांनापाठीमागून मिठी मारली, "काय झालं आमच्या साहेबांना? झोप लागत नाहीये का?"
"हम्म! "
"काय झालं?"
"काही नाही"
"सांगा"
"अगं काही नाही, सकाळी एक मंटू नावाचा मुलगा येईल त्याच्या आईला घेऊन, तुला बागकामासाठी माणूस हवा होता ना! त्याच्या आईला शिकवं आणि आपल्या इथे नोकरी वर ठेऊन घे, आऊट हाऊस मध्ये राहण्याची सोय करून देशील त्यांची! तिन्ही मुले आणि त्यांची आई राहतील तिथं!"
"कोण मुलं? कोणाची आई? काय म्हणताय?"
साहेबांनी संपूर्ण इतिवृत्तांत मेमसाब ला सांगितला!
"खरं सांगू, त्यावेळेस मला माझं पद , माझ्या हातातील पॉवर्स, आपले कायदे हे प्रॅक्टिकली युजलेस वाटले."
"अहो चिल्ड, चालायचंच! उद्या मी बघते, चला झोपा आता!"
ऐश ट्रे मधल्या चार सिगारेट्स च्या थोटकांकडे बघत मेमसाब ने आपली नाराजी व्यक्त केली व साहेबाना जवळजवळ ओढतच त्यांनी बेड वर नेले!
.
जवळ जवळ एक वर्ष झालं मंटू त्याची आई व भावंडं साहेबांकडे राहत होते, त्याची आई  व तो बागकाम करण्यात चांगले तरबेज झाले, आईची ट्रेटमेंट सरकारी हॉस्पिटल मध्ये सुरळीत चालली होती, व जवळजवळ तिचा टीबी सुधारला होता, साहेबाच्या घरी रहात असल्यामुळे त्याच्या राहण्यात, वागण्याबोलण्यात लक्षणीय सुधारणा जाणवत होती.
आणि अचानक एकेदिवशी साहेबांना मंत्रालयकडून मेमो मिळाला की तुम्ही बालकामगार घरी राबवून घेताय त्या बद्दल पटतील अशी कारणे वेळेत द्या! अन्यथा...
- अक्षय प्रकाश नेवे.
(शेअर करण्यास परवानगीची आवश्यकता नाही!)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिवाग्रज , शिवबंधु : संभाजीराजे.

मोहनजोदारो